जळगाव - जिल्ह्यातील रावेर शहरापासून जवळच असलेल्या बोरखेडा शिवारातील एका शेतात चार भावंडांची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्याकांडाच्या घटनेत 13 वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलीवर अत्याचार केल्यानंतर मारेकऱ्यांनी चारही भावंडांची हत्या केल्याची शक्यता असून, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली. यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
ही घटना समोर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यांनी या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाधिकारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखाली 'एसआयटी'ची पाच पथके गठीत केली. त्यात एक पथक हे परिस्थितीजन्य पुराव्यांचे संकलन करत आहे. दुसरे पथक या घटनेचा तांत्रिक बाबींद्वारे तपास करत आहे. तिसरे पथक हे संशयित आरोपी, मृतांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवत आहे. तर उर्वरित दोन पथके ही मारेकऱ्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत. ही घटना समोर आल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी बोरखेडा गावात ठाण मांडून होते. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय -
या घटनेत 13 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय आहे. शेतमालक मुश्ताक शेख हे सकाळी सर्वात आधी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी चारही भावंडांना रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे पाहिले होते. त्यावेळी भावंडांमध्ये मोठी असलेली मुलगी ही विवस्त्र अवस्थेत होती. तिच्यावर मारेकऱ्यांनी अत्याचार केला असावा, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तिचा मृतदेह फॉरेन्सिक व वैद्यकीय चाचणीनंतर विच्छेदनासाठी पाठवला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिच्यावर अत्याचार झाला किंवा नाही? याची माहिती समोर येणार आहे. यासंदर्भात पोलीस मात्र, काहीही माहिती द्यायला तयार नाहीत.
5 ते 6 संशयित ताब्यात, चौकशी सुरू -
या घटनेचा प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी 5 ते 6 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची सर्व बाजूने कसून चौकशी केली जात आहे. मात्र, पोलिसांना ठोस धागेदोरे मिळालेले नसल्याने हत्याकांडामागे काय कारण आहे? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी बोरखेडा गावातील काही ग्रामस्थांची देखील चौकशी केली. भिलाला कुटुंबीयांच्या संपर्कात असलेल्या काही लोकांची देखील चौकशी झाली. मात्र, पोलिसांना खात्रीशीर पुरावे किंवा माहिती मिळालेली नाही. ज्या शेतातील घरात भिलाला कुटुंब वास्तव्याला होते, त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. परंतु, संशयास्पद वस्तू किंवा पुरावे मिळू शकले नाही. पोलिसांनी या हत्याकांडात मारेकऱ्यांनी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे. या गुन्ह्याच्या तपासात अंगुलीमुद्रा तज्ञ, श्वानपथक, फॉरेन्सिक तज्ञ अशा सर्वांची मदत घेतली जात आहे. मारेकऱ्यांना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथे चार भावंडांचा खून; हत्येचे कारण अस्पष्ट
राजकीय नेतेमंडळींकडून घटनास्थळी भेट, कुटुंबीयांचे सांत्वन -
ही घटना समोर आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे माजीमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश धनके, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
'हाथरस'पेक्षाही वाईट घटना - गिरीश महाजन
बोरखेडा येथे घडलेली चारही भावंडांच्या निर्घृण हत्याकांडाची घटना ही हाथरसमध्ये घडलेल्या घटनेपेक्षाही वाईट असल्याचे मत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. या घटनेत 13 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिच्यावर अत्याचार होत असताना इतर तीन भावंडांना जाग आली असावी. त्यामुळे मारेकर्यांनी चौघांना क्रूरपणे ठार केले असावे, अशी शक्यता आहे. पोलीस तपासात नेमके काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी या घटनेतील मारेकर्यांना लवकरात लवकर अटक करायला हवी, अशी मागणी महाजन यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि युवतींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
खासदार रक्षा खडसेंनीही व्यक्त केला अत्याचाराचा संशय -
या घटनेतील 13 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असावा, असा संशय रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करून मारेकऱ्यांना अटक करावी, अशी मागणी खडसे यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, राज्य सरकार मात्र गंभीर नाही, असे रक्षा खडसेंनी सांगितले.
हत्याकांडाचा तपास योग्य दिशेने - पालकमंत्री गुलाबराव पाटील
बोरखेडा हत्याकांडाच्या तपास योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच पोलीस या हत्याकांडाच्या घटनेचा उलगडा करतील, असा आशावाद जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी बोरखेडा येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच गुलाबराव पाटील यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्या आरोपाला उत्तर दिले. ते म्हणाले, हाथरस येथील घटना आणि बोरखेडा येथील घटनेत खूप फरक आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारालाही जाता आले नव्हते. मात्र, बोरखेडा येथे ही दुर्दैवी घटना समोर येताच पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केली. मात्र, गिरीश महाजन यांनी केलेले विधान चुकीचे आहे. ते विरोधक असल्याने विरोधी भूमिका घेतात. जर त्यांनी विरोधी भूमिका घेतली नाही तर त्यांना महत्त्व उरणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.