जळगाव - आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना चांगल्या दर्जाच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेची तिसरी फेरी नुकतीच पार पडली. मात्र, तिसऱ्या फेरीअखेर जिल्ह्यात ४५४ प्रवेश प्रलंबित आहेत. पालकांना पसंतीची शाळा न मिळाल्याने या जागा रिक्त असल्याचे समजते आहे.
जिल्ह्यात यावर्षी आरटीई कोट्यातील प्रवेशाच्या जागा वाढल्याबरोबर शाळांची संख्या देखील वाढली होती. जिल्ह्यातील एकूण २७४ शाळांमध्ये ३ हजार ७१७ जागा उपलब्ध झाल्या होत्या. आतापर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या ३ फेऱ्या पूर्ण झाल्या. मात्र, तिसरी फेरी आटोपल्यानंतरही जिल्ह्यात ४५४ प्रवेश प्रलंबित असल्याचे चित्र आहे. या जागांवर शाळांनी तसेच पालकांनी पुढाकार घेत सुचवलेले प्रवेश पूर्ण करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने प्रवेशासाठी आलेल्या पालकांनी थेट प्रवेश घेत ऑनलाईन अप्रोच किंवा प्रवेशित म्हणून तत्काळ नोंद करणे गरजेचे आहे. या कारवाईसाठी शिक्षण विभागाने २४ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
जिल्ह्यातील ३ हजार ७१७ जागांसाठी तब्बल ६ हजारांवर ऑनलाईन अर्ज शिक्षण विभागाकडे आले. यापूर्वी जिल्हास्तरावर पहिली सोडत काढण्यात येत असे. परंतु, या वर्षीपासून राज्यस्तरावर एकच सोडत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८ एप्रिल रोजी पुण्यात पहिली सोडत काढण्यात आली. त्यानंतर २६ एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र, शिक्षण विभागाच्या कासवगती कारभारामुळे २६ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चिती झाली नाही. यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशाला मुकणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेत सुरुवातीला ४ मे व त्यानंतर पुन्हा १० मे पर्यंत प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवली. आतापर्यंत दोन मुदतवाढ होउन या दरम्यान २ हजारावर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाली आहेत. आता तिसऱ्या फेरीअखेर जिल्ह्यात ४५४ प्रवेश प्रलंबित असल्याने चौथी फेरी घ्यावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.