जळगाव - कोरोनाचा संसर्ग जळगाव जिल्ह्यात वेगाने फैलावत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव शहरात सुरू असलेला उद्रेक कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 381 झाली आहे.
जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील 26, भुसवळ येथील 3 तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या 381 इतकी झाली असून, आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. 40 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.