जळगाव - बदलता काळ लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळांनी देखील अनेक बदल स्वीकारले. डिजिटल शिक्षण पद्धतीचा अंगीकार केला. याच कारणामुळे आज जिल्हा परिषदेच्या शाळा देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत स्पर्धा करू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील एकूण 1 हजार 830 प्राथमिक शाळांपैकी तब्बल 1 हजार 630 शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळेच चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल दीड हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोडून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. विशेष करून ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.
टोलेजंग इमारत, आकर्षक रंगरंगोटी, शिक्षणाचा उच्च दर्जा यासारख्या वैशिष्ट्यांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा वरचढ ठरल्या. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटल्यानंतर सुरू झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा अस्तित्वासाठी अक्षरशः झगडत होत्या. गेली काही वर्षे ही परिस्थिती कायम होती. मात्र, काळाची पावले ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांनी देखील बदल स्वीकारल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत असलेली स्पर्धा आता संपुष्टात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील आता डिजिटल पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असलेला ओढा काहीअंशी थांबला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा या खासगी मालकीच्या असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसतो. अवाजवी शुल्क आकारणी, शिस्तीच्या नावाखाली असलेली कडक नियमावली यांसारख्या अनेक कारणामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यातच ग्रामीण भागातील बहुसंख्य शाळांनी कात टाकल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी असलेले आकर्षण कमी झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील या बदलासंदर्भात जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा परिषदेच्या एकूण 1 हजार 830 प्राथमिक शाळांपैकी तब्बल 1 हजार 630 शाळा आज पूर्णपणे डिजिटल झाल्या आहेत. पक्की इमारत, आकर्षक रंगरंगोटी, सुसज्ज वर्गखोल्या, एलईडी टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक ती पाठ्यपुस्तके व गणवेश अशा प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असलेल्या सर्वच सुविधा या शाळांमध्ये निर्माण करण्यात आल्या आहेत. हाच बदल पालकांची मानसिकता बदलण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळेच चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तब्बल दीड हजारांहून अधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेकडून मागवलेल्या विद्यार्थी पटसंख्येच्या आकडेवारीवरून ही बाब अधोरेखित झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली आहे.
समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. या उद्देशाने शासनाने 'आरटीई'सारख्या अनेक योजना आणल्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकसहभाग देखील मोठ्या प्रमाणावर मिळाल्यानेच हा बदल घडवून आणता आला.