जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 305 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, शुक्रवारी एकाच दिवशी कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत 371 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत नाही तर दुसरीकडे, कोरोनाचे बळी देखील थांबत नसल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा 305 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जळगाव जिल्हावासीयांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 275 झाली आहे. जिल्ह्याने सात हजारांचा उंबरठा ओलांडला आहे.
शुक्रवारी प्राप्त अहवालात जळगाव शहर 52 , भुसावळ 28, जळगाव ग्रामीण 11, अमळनेर 4, चोपडा 20, मुक्ताईनगर 9, भडगाव 25, धरणगाव 7, यावल 3, एरंडोल 4, जामनेर 47, रावेर 20, पारोळा 22, चाळीसगाव 16, पाचोरा 26 तर बोदवड येथे 9 नवे रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 7 हजार 275 बाधित रुग्ण आढळले आहेत. समाधानाची बाब म्हणजे, त्यातील 4 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. शुक्रवारी 227 जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला. सद्यस्थितीत ३१६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
शुक्रवारी 13 जणांचा मृत्यू-
जिल्ह्यात आतापर्यंत 371 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरात 40 वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यात 75 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, चाळीसगाव तालुक्यात 50 व 70 वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यात 52 वर्षीय पुरुष, भुसावळ तालुक्यात 62 वर्षीय व 75 वर्षीय पुरुष तसेच 59 व 60 वर्षीय महिला अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. यावल तालुक्यात 58 व 64 वर्षीय पुरुष तर जामनेर तालुक्यात 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.