जळगाव - गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. बुधवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. पाऊस परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या देखील आता सुरू होणार आहेत. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात खरीप हंगामाचा पेरा 100 टक्के पूर्ण होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच 'निसर्ग' चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. तेव्हा चार ते पाच दिवस सलग चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला होता. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली होती. जुलैच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली होती. नंतर पुन्हा पाऊस गायब झाला होता. आता दोन आठवड्यांनी जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. तर बुधवारी पहाटे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला. जळगाव शहरातदेखील पहाटेपासून पाऊस सुरू आहे. आतापर्यंत चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, भडगाव तालुक्यात पाऊस नव्हता. मात्र, आता सर्वदूर पाऊस होत आहे.
जिल्ह्यातील 75 टक्के पेरण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. आता पावसाने पुनरागमन केल्याने खोळंबलेल्या पेरण्यांच्या कामाला वेग येणार आहे. यावर्षी अपेक्षेप्रमाणे कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. त्यानंतर मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन तसेच कडधान्याची पेरणी झाली आहे. पाऊस सुरू झाल्याने आता काही तालुक्यांमध्ये मका तसेच कापसाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
'हतनूर'मधून पाण्याचा विसर्ग सुरू...
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने बुधवारी सकाळी धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाला आहे. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.