जळगाव - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १३१ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण ६२ हजार ४९२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडू नयेत यासाठी शिक्षण विभागाकडून खास नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा कालावधीत जिल्हाभरात ६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही भरारी पथके परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकही नियुक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या केंद्रांवर खास नजर ठेवण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्र प्रमुखांचा समावेश असणार आहे.