जळगाव - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी दुपारी त्यात पुन्हा 10 ने वाढ झाली असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 124 वर पोहचली आहे. यापूर्वी आजच सकाळी अमळनेरातील 14 व्यक्तींच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर दुपारीच पुन्हा 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात कोरोना बाधितांची संख्या 24 ने वाढली आहे. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण पहिल्यांदा आढळले असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये भुसावळ येथील 5, चोपडा येथील 2, अमळनेर येथील 1 तर जळगावातील मेहरुण व तालुक्यातील ममुराबाद येथील 2 रुग्ण अशा एकूण 10 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 124 इतकी झाली असून, त्यापैकी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.