जळगाव - दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज(सोमवार) दुपारी जामनेर ते पाचोरा रस्त्यावर मालखेडा गावाजवळ घडली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात दोन दिवसात रस्ते अपघातात तिघे ठार झाले आहेत.
हेही वाचा - स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019 : किंग्ज सर्कल ठरले स्वच्छ-सुंदर रेल्वे स्थानक
जामनेर ते पाचोरा रस्त्यावरील मालखेडा गावाजवळ हा अपघात घडला. दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातात ठार झालेल्या तसेच जखमी झालेल्या लोकांची नावे समजू शकली नाहीत. जखमी झालेल्या दोघांना तातडीने उपचारासाठी पाचोरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
रस्त्यांची दुर्दशा उठली जीवावर -
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यांची दुर्दशा वाहनधारकांच्या जीवावर उठली आहे. रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हिरापूर फाट्याजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले होते. त्यानंतर सोमवारी मालखेडा गावाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. खराब रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत.