हिंगोली - सध्या लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. एकही मतदार सुटू नये म्हणून विविध पक्षाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते मतदारांची मोठी सरबराईस करीत असतानाचे चित्र दिसून आहे. एवढेच नाहीतर तळीराम मतदारांनाही आपलेसे करण्यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांना त्यांची काळजी घेण्याचे विशेष फर्मान सोडत आहेत.
जिल्ह्यातील पिंपरखेड येथील रणरागिणींनी मात्र, उमेदवारांचा हा डाव हाणून पाडलाय. यासाठी महिलांनी चक्क मुलाबाळासह पोलीस अधीक्षक कार्यालय अन् दारूबंदी विभागाकडे धाव घेऊन या उमेदवारांची पोल-खोल केली आहे. तसेच याबाबत कारवाई न केल्यास या महिलांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.
निवडणूक म्हटलं की, मतदारांची सरबराईस आलीच. आपणही मतदारांच्या मागणीला अजिबात कमी पडायला नको म्हणून मतदारांची हर एक मागणी पूर्ण करण्यासाठी विविध पक्षाच्या उमेदवाराने स्वतंत्र जबाबदाऱ्या वाटून दिल्याचा प्रकार समोर आले आहेत. जो-तो कार्यकर्ता आप-आपली जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करीत मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गाडी-घोडी पासून ते दारू पिल्यानंतर घरापर्यंत पोहोचविणे अन् कुणी विसरलेच तर त्यांच्यापर्यंत दारू पोहोचवण्याचीही व्यवस्था केली जात असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकाराचा परिणाम मात्र महिलांवर होत आहे. अनेक गावांत दारू विक्रीची अवैध दुकानांची चढाओढ लागते. अशाच परिस्थितीत पुन्हा तेच ते कार्यकर्ते तळीराम मतदारांचे नियोजन लावून देण्यासही तयार आहेत. नेहमी कमी पिणारे तळीराम निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र हात धुवून घेत असल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
मात्र, तळीरामांना होत असलेल्या या राजविलासी सोयीने अनेक गावातील शांतता भंग होत असल्याचे प्रकारही काही दिवसांपासून वाढले आहेत. या सर्व प्रकाराला मात्र महिला अक्षरशः कंटाळलेल्या आहेत. त्यामुळेच पिंपरखेड येथील महिलांनी आज दुपारी लेकराबाळासह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक, दारूबंदी कार्यालयात धाव घेतली. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे होत असलेले दुष्परिणामांचा पाढाच त्यांनी या अधिकाऱ्यासमोर वाचला. उमेदवारांकडून कशाप्रकारे तळीरामांची सोय केली जात आहे. याचीही पोलखोल केली आहे.
तर मतदान करणार नाही-
पूर्वी पासूनच पिंपरखेड येथे अवैध दारू विक्री केली जाते. मात्र, आता निवडणुकीच्या कालावधीत जरा जास्तच दारूविक्री होत आहे. त्यामुळे अनेक महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर बऱ्याच महिलांच्या घरात नेहमीच भांडणाचे प्रमाण वाढले आहे. आता ऐन निवडणुकीच्या काळात महिलांनी दारूबंदीसाठी केलेली मागणी हे प्रशासन कितपत गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दारूबंदी न केल्यास महिला १८ एप्रिल रोजी होणाऱ्या आम्ही मतदान करणार नसल्याचा एक इशाराच महिलांनी प्रशासन व निवडणूक विभागाला दिला आहे.