हिंगोली - जिल्ह्यातील मालसेलू येथील पाणीटंचाई जिल्ह्यात चांगलीच प्रसिद्ध आहे. अशा स्थितीत रेल्वे स्थानकावरील हातपंपाचे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थ आणि महिलांना स्टेशन मास्टरकडून शिवीगाळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच येथील हातपंपाला स्टेशन मास्तरकडून चक्क कुलूपही लावले जात आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने कसाबसा सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. मात्र, त्याही नळाचे पाणी काही दिवसांपासून बंद झाले. त्यातच ही समस्या निर्माण झाली आहे. महिला हातपंपाचे कुलूप उघडण्याची विनंती करतात. पाणी भरायला आलेल्या महिलांना कर्मचारी वरिष्ठांची भीती दाखवत हाताला धरून स्टेशन बाहेर हाकलून लावत असल्याचेही समोर आले आहे.
हातपंपाला कुलूप लावल्याने माळसेलू येथील महिला चांगल्याच संतापलेल्या आहेत. पाणी भरण्यासाठी महिला आल्या, की या कर्मचाऱ्यांना शिव्या देण्याची सवयच लागल्याचे दिसून येत आहे. भयंकर पाणी टंचाई असल्याने महिला शिवीगाळ ऐकूनही मेटाकुटीस येऊन स्टेशन मास्टरला हातपंपाचे कुलूप उघडण्यासाठी विनवणी करतात. एवढेच नव्हे, तर याच कर्मचाऱ्याने अनेकदा महिलांचे भांडेही फेकून दिले आहेत. मात्र, अजूनही याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही.
या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन लक्ष देईल काय?
मालसेलू येथील पाणी प्रश्न हा दरवर्षीच तापलेला असतो. गावा शेजारी असलेल्या विहिरी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. वर्षानुवर्षे उद्भवणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही पक्षाचा पुढारी समोर येत नसल्याने येत्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे गावात वाटर फिल्टरचा प्लँट आहे. मात्र, विक्रीच्या पाण्यावर तहान भागवणे गोरगरिबांना शक्य नाही. आता रेल्वे प्रशासन ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप मोकळा करून देणार का? याकडे लक्ष लागले आहे.