हिंगोली - सर्वांचे लक्ष लागलेल्या कोरोना लसीकरणास आजपासून प्रारंभ झाला आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णायात 200 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने या लसीकरणाची पूर्व तयारी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला.
परिश्रमानंतरचे यश
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाला हरविण्यासाठी रात्रंदिवस डॉक्टर, परिचारिका व इतर ही कर्मचारी परिश्रम घेत होते. त्याला यशदेखील आले. अन् आता त्याच कोरोना योद्ध्यांसाठी शासनाच्यावतीने लस उपलब्ध करून दिलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वप्रथम डॉ. दीपक मोरे यांना लस देण्यात आली.
200 जणांना दिली जाणार ही लस
प्रशासनाने बारकाईने नियोजन केले होते, सकाळी साडेदहा वाजता लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
पथकाची नेमणूक
लस देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने पथकाची नेमणूक केली असून, नियोजनानुसार आता ही लस दिली जाणार आहे. पहिल्याच दिवशी 200 जणांना ही लस देण्यात आली आहे.
टप्प्याटप्प्याने दिली जाणार लस
जिल्ह्याला साडे सहा हजार लास प्राप्त झाली आहे. पहिल्याच दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालय व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. दीपक मोरे यांना तर द्वितीय लस नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य रमागिरी यांना देण्यात आली. लस टोचण्याचे काम सायकली सेविका ज्योती पवार आरोग्यसेविका कलावती राठोड यांनी केले. जिल्ह्यामध्ये सहा हजारपेक्षा जास्त लस उपलब्ध झाले असून त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व कोरोनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.