हिंगोली - दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत चालली आहे. एका अटल दुचाकी चोरट्यास हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून तब्बल 29 दुचाकी जप्त केल्या आहेत. एवढ्या मोठ्या दुचाकी जप्त केल्याने खळबळ तर उडालीच, मात्र हे रॅकेट मोठे असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सचिन उर्फ राजू रामा खिल्लारे (26, रा. गडद गव्हाण, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. तर हा आरोपी इतर दोन सहकाऱ्याच्या सहाय्याने दुचाकीची चोरी करून, बनावट आर. सी. बुक तयार करून दुचाकी गडद गव्हाण, दाभा, जोड परळी, टेंभुर्णी, दिग्रस येथे विक्री केल्याची खात्रीपूर्वक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकांने धाव घेतली. त्याच्याकडून हिंगोली येथून 2, नांदेड 2, परभणी 1, वाशिम 3, औरंगाबाद 2, अकोला 1, बुलढाणा 1 यासह इतर जिल्ह्यातून 29 दुचाकी जप्त केल्या आहे.
मामा भाच्याचा चोरीमध्ये सहभाग....
या चोरीच्या घटनेत आरोपी हा चोरीच्या दुचाकी लांबून पुढील प्रक्रिया करण्यासाठी आपला मामा हरिदास वकटीराम टापरे, अरविंद हरिदास टापरे (रा. पांगरी) हे मदत करत होते. हे दोघे दुचाकींचा चेसीस, इंजिन नंबर तसेच छापा यांच्यात छेडछाड करून बनावट आर. सी. बुक तयार करत असत. तसेच काही दुचाकींचे कागदपत्रे नंतर देतो, असे म्हणून विक्रीदेखील करीत असे. त्याच्याकडून 26 अन् घरासमोर लावलेल्या 3 दुचाकी अशा एकूण 15 लाख 56 हजार रुपयांच्या 29 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी हे फरार असून, हरिदास टापरे याने दुचाकी चोरली आहेत. त्याच्याकडून अजूनही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या पथकाने केली कारवाई...
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, सपोउपनी बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, संभाजी लेकुळे आदींनी कारवाई केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत त्यानी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधून दुचाकी घेऊन जाण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने केले आहे.