हिंगोली - जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी असेच दुचाकी चोरांचे रॅकेट हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथून ताब्यात घेतले होते. आज परत दोन चोरट्यांसह आठ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये नांदेड, पुसद, वाशिम येथुन चोरी केलेल्या दुचाकींचा समावेश आहे.
बजरंग गजानन व्यवहारे (२६, रा. शास्त्री नगर कळमनुरी), गजानन अशोक सूर्यवंशी (३३, रा. शेबाळ पिंप्री जि.) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन चोरट्यांनी वाशिम नांदेड पुसद येथून दुचाकी चोरून कळमनुरी येथील बजरंग उर्फ आकाश व्यवहारे यांच्या घरासमोरील अंगणात त्या दुचाकी विक्रीसाठी ठेवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनी शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी येथे बजरंग व्यवहारे यांच्या घरावर छापा मारला असता तेथे विविध कंपनीच्या आठ दुचाकी आढळून आल्या.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून घेतली मूळ मालकांची माहिती -
आठही दुचाकी ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ मालकाचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती घेण्यात आली तर त्यापैकी (पुसद, जि. यवतमाळ) येथील सुरेश यशवंत फुलटे, नांदेड येथील आईनानगर भागातील सयद जावेद स. मोईन, तसेच नांदेड येथीलच राजेश गोपालदास मोदी, उमरखेड येथील शेख अनवर शेख हबीब आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव (ता. मुचंडी) येथील मोहन गंगाराम भातकंडे यांच्या दुचाकी असल्याचे समोर आले. मात्र इतर तीन दुचाकीच्या मालकांची माहिती उपलब्ध होऊ न शकली नसल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
आताही दुचाकीसह दोघांना ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल हा चार लाख रुपये किंमतीचा आहे.