हिंगोली : औंढा नागनाथ-जिंतूर रस्त्यारील गोळेगाव फाट्यावर झालेल्या एसटी बसच्या धडकेत दुचाकी वरून जाणाऱ्या मामा भाच्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. प्रथमेश प्रकाश थिटे, श्रीराम पाटील (रा. गोळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - वसमतमध्ये विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
या अपघातातील एम. एच. 20 बी. एल. 2854 या क्रमांकाची बस ही कळमनुरीवरून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. या एसटीला गोळेगाव जवळ एसटी खाली दुचाकी आल्याने अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळाचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मामा भाच्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असल्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे.
हेही वाचा - हिंगोलीतील 'या' गावात मृत्यूनंतरही नाही सुटका.. सरणावर जाईपर्यंत भोगाव्या लागतात यातना
अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमधून पाठवले आहेत. अपघाताचे ठिकाण हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने, ही बस तेथे हलवली जात असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली.