हिंगोली - मुंबई येथील चिंचपाडा ते औंढा नागनाथ या मार्गे खासगी वाहनातून दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी 13 जणांसोबत प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघे पॉझिटिव्ह रुग्ण बाप लेक असून, हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तपासणी केलेल्या मुंबई येथील रुग्णालयाला प्राप्त झाला. ही माहिती मुंबईतील चिंचपाडा येथील आशा वर्कर सुकेशनी धुळेने औंढा नागनाथ तालुक्यातील नातेवाईकांना कळविल्याने पुढील अनर्थ टळला. त्या सर्वांना ताब्यात घेत औंढा नागनाथ येथील भक्त निवास मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती औंढा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खूपच सतर्क झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक जण मुंबई येथे चिंचपाडा येथे कामानिमित्त गेले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी काहीही काम नसल्याने कामानिमित्त गेलेल्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात तपासणी केली आणि सर्वजण एका खासगी वाहनाने औंढा नागनाथकडे रवाना झाले. जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांनी केला.
अहवाल मिळताच सतर्क झालेल्या एका आशा वर्करने ही बाब आपल्या औंढा नागनाथ तालुक्यातील नातेवाईकांना कळवली त्यानुसार नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या पथकाला हा प्रकार सांगितला. आरोग्य विभागने ही माहिती मिळाल्यानंतरमुंबई वरून येणाऱ्या सर्वांचे संपर्क क्रमांक घेतले.
मुंबईवरुन येणाऱ्या कोरोनाबाधितांशी संपर्क साधून त्यांना औंढा नागनाथ येथील बस स्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण औंढा नागनाथ येथे आल्यानंतर आपल्या गावाकडे जाणार होते. मात्र, मुंबई येथील एका आशा वर्करमुळे पुढील अनर्थ हा टाळण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात 259 एवढी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 229 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत एकूण 30 रुग्णावर विविध कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. आज सकाळी 8 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.