हिंगोली - निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे तर त्यांचे पूर्णता कंबरडे मोडले असून शेतामध्ये उरलेल्या तुरीच्या देखील तुराट्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे परिश्रम पूर्णपणे वाया गेले आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन हातातोंडाशी आलेली तूर देखील हातची गेल्याने तुरीच्या डाळीवर याचा निश्चितच परिणाम होणार असल्याचे आतापासूनच जाणवत आहे.
यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण गेले आहे. अगोदरच पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आणि आता ही सर्व संकटे एकदाच आल्याने शेतकरी हा चांगला भांबावून गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे होते, मात्र त्यांनीदेखील पंचनामे करत केवळ 50 टक्के नुकसान भरपाई दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासन स्तरावर मिळणारी मदत आहे. ती अर्ध्यावर येऊन ठेवली ही मदत देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. अन् आता आशा होती ती तुरीची मात्र ती तूरदेखील अज्ञात रोगामुळे पूर्णता वाळून गेली आहे. त्यामुळे आता नेमका संसाराचा गाडा चालवायचा कसा? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यास समोर आ वासून आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना धीर देण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र नुकसान भरपाईची मदतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली नसल्याने शेतकरी आज घडीला पूर्णपणे भांबावलेल्या स्थितीमध्ये आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीच्या भरोशावर संसाराचा गाडा चालवण्यासाठी इतरांकडून उचल देखील घेतलेली आहे. मात्र, आता तूरच हातची गेल्यामुळे ते पैसे फेडायचे कसे? या चिंतेमध्ये शेतकरी सापडलेले आहेत.
डाळीवर होणार विपरीत परिणाम
तूर हातची गेली असल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकऱ्यांना क्विंटलने तूर होणार होती, त्या शेतकऱ्यांना आता किलोने तूर होईल. त्यामुळे तुरीचे भाव जरी वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे तूरच नसल्याने भविष्यात तुरीच्या डाळीचे भाव वाढणार आहेत. हे चित्र आतापासूनच दिसून येत आहे. यंदा तुरीचे पीक चांगल्याप्रकारे होते, त्यामुळे डोक्यावरील कर्ज कमी होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र काढणीयोग्य तुरी झाल्यानंतर सर्वच हातच्या गेले आहेत, त्यामुळे काही केल्या त्यांनाही डोक्यावरील कर्ज कमी होणार असल्याचे धक्कादायक चित्र असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अक्षरशा शेतकरी चांगलाच गोंधळून गेलेला आहे, तुरीला शेंगा लागलेल्या नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीवर नांगर फिरवलाय तर काही शेतकऱ्यांनी तुरीमध्ये गुरे सोडली आहेत. अक्षरश: शेतकरी हा या विदारक परिस्थितीने हतबल झाला आहे.