हिंगोली - दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या अट्टल चोरट्याने पोलीस कोठडीतच फरशीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली. कोठडीत सर्वत्र रक्त सांडले असून या गंभीर प्रकाराने पोलीस प्रशासन चांगलेच हादरून गेले आहे. चोरट्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. देविदास बाबुराव कांबळे अस या चोरट्याचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड येथून अटक केली होती. दरम्यान, त्याने विक्री केलेल्या ठिकाणावरून तब्बल २६ दुचाकी जप्त करत गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याला बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते. यानंतर चोरट्याला आखाडा बाळापूर पोलिसांनी रविवारी सेनगाव न्यायालयात हजर केले. तेथे त्याला २० तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी न्यायालयातून बाळापूर ठाण्यात परत नेत असताना, चोरट्याने कळमनुरी तालुक्यातील मोरवाडी येथे वाहनात दोनच पोलीस कर्मचारी असल्याचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले होते. यामुळे त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी रात्रभर सारा शिवार पालथा घातला, दरम्यान, हा चोरटा पोलिसांना पहाटे एका झाडावर आढळून आला. त्यानंतर त्याला बाळापूरच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
दरम्यान, आज मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास या चोरट्याने पोलीस कोठडीतील फरशीच्या तुकड्याने स्वतःचा गळा चिरला. आणि अंगावर पांघरून घेऊन झोपून राहिला. मात्र, कोठडीत मोठ्या प्रमाणात रक्त जमा झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार निर्दशनास आला. यानंतर चोरट्याला तत्काळ उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र, या दुचाकी चोरट्याने आखाडा बाळापूर पोलिसांच्या अशा वेगवेगळ्या कृत्यांमुळे चांगलेच नाकीनऊ आणले आहेत. याची चर्चा सर्वत्र चांगलीच रंगत आहे.