हिंगोली- जिल्ह्यामध्ये हळूहळू पाणीटंचाई जाणवू लागली आहे. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसत असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या शोधात असलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना माळहिवरा येथे सोमवारी घडली. राहुल वसंत भोसले (१३) रा. माळहिवरा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
माळहिवरा येथे ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना ही नावालाच आहे, गावाला नियमित पाणीपुरवठा होत नाही. आणि आता तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार देखील केली, मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान आज सकाळी राहुल भोसले हा पाणी आणण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवर गेला होता. मात्र बराच वेळ होऊन देखील राहुल घरी न परतल्याने, त्याच्या कुटुंबीयांनी विहिर परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो विहिरीत मृत अवस्थेत आढळला.
लाखो रुपयांची योजना कागदावर
माळहिवरा येथे पाणी पुरवठा योजनेतून दोन ते तीन विहिरींचे खोदकाम करण्यात आलेले आहे. मात्र एका ही विहिरीवरून गावातील पाण्याच्या टाकीला पाईप लाईन जोडण्यात आलेली नाही. त्यामुळे टाकीत पाणी नसल्याने अजूनही गावातील नळाला पाणी येत नाही. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात आज पाणीटंचाईचा एक बळी गेला आहे. यानंतर तरी ग्रामपंचायतीला जाग येणार का? आणि पाणीपुरवठा सुरळीत होणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी