हिंगोली - टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.17नोव्हेंबर)ला बॉयलर प्रदीपन समारंभाचा कार्यक्रम पार पडला. गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वसमत परिसरात सर्वाधिक सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होते. यामुळे सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वसमतमध्ये आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहरातील दोन्ही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दर्जेदार ऊसाचे उत्पन्न निघणार असून त्याला चांगला भाव मिळणार असल्याचे चेअरमन जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी ऊसाला समाधानकारक भाव देण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यात आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बॉयलर अग्निप्रतिबंधक समारंभाची पूजा टोकाई कारखान्याचे संचालक गजानंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चेअरमन अॅड. शिवाजी जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.