हिंगोली - हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या पीकात आजघडीला गुडघाभर पाणी साचले आहे. या पिकांचा साधा विचार जरी केली तरीही काळजात चर्रर्र होता. एका बॅगचा खर्च बारा ते तेरा हजारावर आहे. आणि पाऊस हजेरी लावून बसला आहे, अशी खंत शेतकऱ्यांनी मांडली आहे.
ही व्यथा मांडली आहे कळमनुरी तालुक्यातील आसोलवाडी येथील एका शेतकऱ्याने. ही परिस्थिती केवळ माझीच नाही तर, संपूर्ण राज्यातील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
हिंगोली जिल्ह्यांमध्ये साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. अशातच कपाशी, उडीद, मूगही नियमितच्या पावसामुळे हातचे गेले आहेत. त्यामुळे यंदा मूग अन उडदाची डाळ न शिजण्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नगदी पीक म्हणून असलेल्या सोयाबीनचा पूर्णपणे चिखल झाला आहे. सोयाबीनची कापणी तर करता येत नाहीच. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे उभ्या सोयाबीनला शेंगामधूनच अंकुर फुटले आहेत. त्यामुळे ही सोयाबीन कापून विकण्यासाठीही उपयोगाची नाही. यासाठी डोक्यावरील कर्ज कसे फेडावे याची चिंता भेडसावत आहे.
पीकाला बाजारात नेऊन काय करणार
सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन हे काढणीयोग्य झालेले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले तर बाजारात भाव मिळत नाही. मातीमोल दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हिंगोली जिल्ह्यात एक दोन शेतकऱ्यांची सोयाबीन अकरा हजार रुपयाने घेतली गेली. आता ती पाच ते तीन हजाराच्यावर खरेदी केली जात आहे.