हिंगोली - विदर्भातील पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. ही पालखी आज सकाळी मराठवाड्यात दाखल झाली. हिंगोली जिल्ह्यात पालखी दाखल होतच भाविकांकडून ठीक - ठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. भगव्या पताका आणि टाळ मृदूंगाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले आहे. जिल्ह्यात विविध भागात पालखी तीन दिवस मुक्काम करुन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे.
पालखीसोबत फिरते रुग्णालय आहे. तर पालखीमध्ये पांढरीशुभ्र वस्त्र परिधान केलेले वारकरी संप्रदाय सर्वांचेच आकर्षण ठरत आहेत. पाणकनेरगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे यावर्षीही जंगी स्वागत केले. पालखी दाखल होत असलेल्या रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या असून, पुष्पगुच्छ घेऊन महिला पुरुष पालखीचे स्वागत करत आहेत. गावात पालखी दाखल होणे म्हणजे हिंगोलीकरांसाठी ही एक पर्वणीच आहे. अनेक दिवसापासून या पालखीच्या स्वागताची तयारी जिल्ह्यातील विविध भागात केली जाते. प्रथम मराठवाड्यात पालखी दाखल होत असताना पाणकनेरगाव येथे स्वागत केले जाते. नंतर तेथून पालखी मार्गस्थ होते. गावात 'जय गजानन जय गजानन'चा गजर सुरू असल्याने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
असा आहे 'श्री'च्या पालखीचा मार्ग
मंगळवारी पाणकनेरगाव तर रात्री सेनगाव येथे मुक्काम, बुधवारी नरसी नामदेव येथे आगमन तर डीग्रस कऱ्हाळे येथे मुक्काम, गुरुवारी ओंढा नागनाथ येथे आगमन तर जवळा बाजार येथे मुक्काम. शुक्रवारी आडगाव रंजे येथे आगमन तर त्रिधारा येथे मुक्काम आणि शनिवारी परभणीमार्गे पालखी मार्गस्थ होणार आहे.