हिंगोली - शहरात वाहतूक शाखेच्या वतीने सुरक्षा सप्ताह पाळला जातोय. यामध्ये वाहतूक शाखेच्या वतीने वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जात आहेत. गुरूवारी चक्क डोक्यावर मोठमोठाली शिंगे, हातामध्ये गदा तर दुसऱ्या हातामध्ये गळफास घेऊन यमराज रस्त्यावर फिरत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना फास लावून समजावून सांगत होता. काही दुचाकीस्वार फोनवर बोलत दुचाकी चालवताना आढळल्याने त्यांची गाडी अडवून त्यांना त्यांची चूक समजावून सांगत ही चूक कायम राहिल्यास तुमची थेट माझ्यासोबत भेट होईल, ती ही परलोकी स्वर्गात. हा सर्व प्रकार वाहतूक शाखा कार्यालय परिसरात सुरु होता. काळ्या कुट्टा कपड्यामध्ये यमराज रस्त्यावर फिरत असताना सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे जात होत्या त्यामुळे आपसूकच संदेश ऐकण्यासाठी असल्याचे दिसून आले.
हिंगोली मध्ये वाहतूक शाखेच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आल्याने, वाहतूक शाखेचे कौतुक केले जात होते. तर चित्रगुप्त नियम मोडणाऱ्याची नावे यमराजाला वाचवुन दाखवत होता. एवढेच नव्हे तर वाहतूक नियम हे किती महत्वाचे आहेत अन ते पाळल्याने आपले जीवन कसे सुखकर राहील ते न पाळल्याने मी तुम्हाला कसा अलगद उचलून नेईल हे यमराज सांगत होता. एवढेच नव्हे तर आपल्या निष्काळजीपणामुळे आपला अपघात झाल्यास आपल्या कुटुंबाला त्याची किंमत कशाप्रकारे मोजावी लागते हे सर्व यमराज चित्रगुप्त वाहनचालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
वाहतूक शाखेचे ते सह पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांनी देखील या सप्ताहानिमित्त वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यमराज आणि चित्रगुप्त यांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी वाहतूक शाखा कार्यालय परिसरात वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.