यवतमाळ - पीकविमा नुकसान अर्ज भरण्यासाठी आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयावर एकच गर्दी केली. दारव्हा तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा पावसामुळे खेळखंडोबा झाला आहे.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे
दिवाळीमुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पीकविमा नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस असल्यामुळे दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा, यासाठी नुकसानीचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात गर्दी केली होती. नुकसान भरपाई अर्ज सादर करण्यासाठी कमी दिवस मिळाल्याने अर्ज भरण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.