हिंगोली - जिल्ह्यातील खेरडा येथे शेतशिवारात जाण्यासाठी असलेल्या पांदन रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने, चिखल तुडवत शेतकऱ्यांना शेत गाठावे लागत होते. एवढेच नव्हे तर शेतात खते बी-बियाणे नेण्यासाठी गाढवाचा देखील आधार घ्यावा लागतोय, ही परिस्थिती 'ईटीव्ही भारत'ने पुढे आणल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी खेरडा येथे धाव घेऊन रस्त्याला भेट दिली. याच वर्षी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतामधील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे आज रस्त्यावर ग्रामस्थांना चालता देखील येत नाही. हिंगोली तालुक्यातील खेरडा वाडी येथे नीट रस्ता नसल्याची बाब उघडकीस आली.
गावात पांदण रस्ता असलेल्या रस्त्यामध्ये मोठ्याप्रमाणात चिखल तसेच ओढा असल्याने शेतकऱ्यांना शेतातून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा तर शेतकऱ्यांना मध्येच ठोकण्याची वेळ येते. ही परिस्थिती 'ईटीव्ही भारत'ने पुढे आणल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी गावात धाव घेऊन या रस्त्याची पाहणी केली. रस्ता याच वर्षी पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले त्यामुळे दिवस-रात्र रस्त्यासाठी त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.