हिंगोली - जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बळीराजा हा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होता. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, आज रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने सर्वच पिके टवटवीत दिसत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला होता. बँकेने कर्ज न दिल्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची आतापासून चिंता लागल्याचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.
जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून कमी पर्जन्यमान होत आहे. यावर्षीची देखील परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच पाऊस जोरदार झालेत. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली आहे. परंतु, तब्बल पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके पूर्णतः सुकून जात होती. पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात शेतकरी पिकांना टँकरने पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. खासगी तसेच विविध बँकाकडून कर्ज घेऊन पेरणी केलेले शेतकरी चांगलेच निसर्गाच्या कोंडीत सापडलेले आहेत. मात्र, आज रिमझिम पावसाने का होईना शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.