हिंगोली - कोरोना विषाणूचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसला आहे. देहविक्री करून पोट भरणाऱ्या महिलांची देखील मोठी अडचण झाली आहे. कोरोना काळात त्यांचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. या महिलांनी मदतीसाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे धाव घेऊन वेश्या व्यवसायाला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
नियमात बसत नाही मात्र, इलाज नाही -
आम्ही देहविक्री करतो. यातून होणाऱ्या कमाईवरच आमच्या घरातील चूल पेटते. मुला-बाळांच्या शिक्षणाचा, आजारपणाचा खर्चही याच पैशातून भागतो. यावर्षी कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातच प्रशासन आणि पोलीस आमच्यावर कारवाई करीत आहे. त्यामुळे आमचा व्यवसाय पूर्णपेणे बंद पडला आहे. आमच्याकडे दुसरे व्यवसायाचे साधन नाही. देहविक्रीमुळे बदनामी होते, परिणामी कोणी कामही देत नाही. अशा परिस्थितीत जीवन जगावे तरी कसे? असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. त्यामुळेच इच्छा नसतानाही नाईलाज म्हणून आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे यावे लागले, असे या महिलांनी सांगितले.
पोलिसांनी अनेक वेळा टाकले छापे -
मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीवर छापा टाकून या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. देहविक्री करण्यासाठी पोलिसांनी बंदीही घातली आहे. त्यामुळे या महिलांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून या महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
योजना फक्त कागदावरच -
देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने अनेक योजना सुरू आखल्या आहेत. मात्र, त्या सर्व कागदावरच आहेत. प्रत्यक्षात या महिलांकडे कुणाचेही लक्ष नाही. आता त्यांचा व्यवसायही बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष -
देहविक्री करणाऱ्या महिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. तसे निवेदनही त्यांनी सादर केले आहे. आता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.