हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी होणारी हेळसांड अद्याप थांबलेली नाही. गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. २ ते ३ दिवसांपूर्वीच एका गरोदर मातेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली होती. आता पुन्हा एकदा त्याच रस्त्याने शुक्रवारी रात्रीच्या वेळी गरोदर महिलेला बाजेवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवावे लागले आहे.
न्यायालयाच्या सुचनांकडे दुर्लक्ष-
मागील वेळीच झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. तेव्हा कुठे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी करवाडी या गावाकडे धाव घेतली, मात्र तेदेखील रस्त्याअभावी गावापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांनी हारवाडी येथून बनवण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याची पाहणी केली आणि रस्ता वापरण्यायोग्य असल्याचे सांगत ते निघून गेले. मात्र ग्रामस्थांना चिखलात रस्ता पार करावा लागत आहे. ही भयंकर अवस्था पाहून खुद्द न्यायालयाने या रस्त्याची दखल घेतली आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत करवाडी या गावामध्ये आरोग्य पथक तैनात ठेवण्याच्या सूचनाही हिंगोली प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्या सूचनांचे पालन तर केलेच नाही उलट रस्ता नसतानादेखील रस्ता असल्याचे प्रशासन भासवत आहे.
यावरून हे स्पष्ट होते, की प्रशासन खरोखरच करवाडी येथील ग्रामस्थांच्या दशेकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा हा पाऊस सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. कळवाडी ते नांदापूर या रस्त्यावर एवढा भयंकर चिखल आहे की हा रस्ता पार करताना अंगावर शहारे उभे राहतात.