हिंगोली - नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेचे कार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी आठ ठिकाणी भाजीपाला बाजार सुरू केला होता. मात्र, काही ठिकाणी 'सोशल डिस्टन्स'ची समस्या निर्माण झाल्याने दोन ठिकाणचा भाजीपाला बाजार रद्द करून तो दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात येणार असल्याची माहिती रामदास पाटील यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना एक दिवसाआड भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरातील आठ ठिकाणी नगर पालिकेच्या वतीने बाजार सुरू केला होता. या ठिकाणी भाजी विक्रेत्यांसोबतच ग्राहकांसाठीदेखील सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी जागा आखण्यात आली होती. मात्र रिसाला बाजार आणि चिमणी बाजार, मेहराजुलूम येथील मार्केट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगर पालिकेच्या वतीने शहरातील मैदाने आता ताब्यात घेण्यात आली आहेत. यापैकी रामलीला मैदान, अटल मैदान, जिल्हा परिषद मैदान, खटकाळी, मंगळवारा बाजार या ठिकाणी आता भाजीपाला बाजार भरणार आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या मैदानांवर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी भाजी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी आखणी केली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहनांवर बंदी घातलेली असल्याने बाजारात वाहने घेऊन येणाऱ्यांवर मात्र कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सय्यद यांनी सांगितले.