हिंगोली- प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता आजकालच्या प्रेमी युगलांमध्ये निर्माण झाली आहे. लग्नापूर्वी, किंवा हळदीच्या अंगाने नवरी पळून जाण्याच्या घटना आपण आतपर्यंत ऐकल्या आहेत. मात्र, लग्न झाल्यानंतर देवदर्शनाला आले असता प्रियकरासोबत धूम ठोकल्याचा प्रकार जिल्ह्यातील ओंढा नागनाथ येथे शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडला आहे. या प्रकाराची जिल्ह्यात एकच चर्चा रंगत आहे.
लग्नसराई सुरू असल्याने रोजच औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी नवविवाहित जोडप्यांची गर्दी होत आहे. असेच एक नवविवाहित जोडपे खासगी वाहनाने शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास औंढा येथे आले होते. नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर बसस्थानका शेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये नवविवाहीत जोडप्याने चहा पाणी घेतले. यावेळी त्यांच्यासोबत वधुचे वडीलही होते. आपल्या जावायाशी चर्चा सुरू असताना नववधुने नवरदेव व आपल्या वडीलाची नजर चुकवून हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या आपल्या प्रियकराच्या पल्सर दुचाकीवर बसून हिंगोलीकडे धुम ठोकली.
हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये बसलेल्या नवरदेवाने पाहिला. त्याने हा प्रकार समोरच बसलेल्या सासऱ्यांना सांगितला. त्यामुळे आरडाओरडा करत हॉटेलमधुन बाहेर येत असताना प्रियकराने फिल्म स्टाइलने नववधु गाडीवर बसून पळवीली. या घटनेची परीसरात चांगलीच चर्चा रंगली होती. नवरदेव व वधुचे वडील यांनी दोघांनाही जोरजोरात आवाज देत थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नववधूने मागे धावत येणाऱ्या पित्याकडे साधे वळून देखील पाहिले नाही. या प्रकाराने वधूचे वडील व नवरदेवाकडील मंडळीचे चेहरेच उतरून गेले होते.
बसस्थानक परिसरात असलेले अनेक जण या नवरदेवाच्या गावाची विचारपूस करीत होते. मात्र, ते कोणालाही काही बोलण्याच्या मनस्थीतीत नव्हते. दरम्यान या प्रकरणी औंढा पोलिसांत कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याने कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.