हिंगोली - एकेकाळी धडाक्याने चालणारा म्युझिक सेंटरचा व्यवसाय कालबाह्य होत चालल्याने व्यावसायिक दुसऱ्या व्यवसायाच्या शोधात आहेत. २१ वे शतक सुरू झाले, संगणक आले आणि त्यानंतर इंटरनेटने आपले जाळे पसरवायला सुरुवात केली. मात्र, आता इंटरनेटच्या वाढलेल्या वापरामुळे म्युझिकचा व्यवसायच ठप्प होऊ लागला आहे. त्यामुळे आता नेमके करावे तरी काय? हा प्रश्न या व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. हिंगोली येथील गणेश दडके या म्युझिक सेंटर चालकाने आपली व्यथा सांगितली आहे.
एक काळ होता की, आपल्या आवडीची गाणी भरून मिळावित म्हणून वारंवार लोक म्युझिक सेंटरमध्ये जात असायचे. एवढेच नव्हे तर अल्बममधील आपल्या आवडीच्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीची गाणी शोधण्यासाठी तासनतास घातले जायचे. एवढे करूनही जर समाधान झाले नाही तर ते गाणे शोधण्यासाठी परत परत फेऱ्या घालण्याची तयारी ग्राहकांमध्ये असायची. मात्र, आता इंटरनेटमुळे हे सर्व काही आता कालबाह्य झाले आहे. आता, एका क्लिकवर आपल्या मोबाईलमध्ये गाण्याची लिस्ट आपल्या डोळ्यासमोर मिळत असल्याने म्युझिक सेंटरकडे जाणारी पावले आता थांबली आहेत. त्यामुळेच पूर्वी गाणे भरण्यामध्ये मग्न असलेले म्युझिक सेंटर चालक देखील आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा - हिंगोलीत 'त्या' घटनेचा निषेध; बलात्कारी व मारेकऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी
पूर्वीपासून सुरू असलेला म्युझिक सेंटरचा व्यवसाय सोडून, नेमका कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न आता या व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्वी वापरात असलेल्या महागड्या वस्तू पाहून म्युझिक सेंटर चालकांना देखील वाईट वाटत आहे. मात्र, इंटरनेटच्या प्रभावामुळे सर्व पर्यायच बंद झाले आहेत. एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील अजूनही बऱ्याच म्युझिक सेंटर चालकांनी जिद्द सोडलेली नाही. ते मोबाईलमधील मेमरी कार्ड भरून देण्याची तयारी दर्शवीत आहेत. मोबाईलमध्येच कोणतेही आपल्या आवडीचे गाणे अवघ्या काही सेकंदात उपलब्ध होत असल्यामुळे म्युझिक सेंटरमध्ये जाणेच आता टाळले जाते.
सुरुवातीला रेकॉर्ड प्लेयरनंतर सीडी, कॅसेट याचा सर्वाधिक जास्त वापर व्हायचा. मात्र, इंटरनेटने आता या सर्वांनाच खेळण्यात टाकले असून सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक म्युझिक सेंटरमध्ये कॅसेट रेकॉर्डर प्लेयर हे आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. पूर्वीचे टेपरेकॉर्डर देखील धूळखात पडलेले आहेत. त्यामुळेच म्युझिक सेंटर व्यावसायिकांसमोर आता उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, ते दुसरा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे हिंगोली येथील म्युझिक सेंटरचालक दडके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. आजही बरेच म्युझिक सेंटर चालक दुकानाच्या बाहेर उभे राहून ग्राहकांची प्रतिक्षा करताहेत. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे चित्र हिंगोली येथे दिसून येत आहेत.
हेही वाचा - हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण तेरा वर्षात पहिल्यांदाच भरले