हिंगोली : कोरोनाने सर्वांनाच हादरुन सोडले आहे. त्यातच हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा चिंता वाढवत आहे. त्यामुळे येथे मनुष्याच्या खाण्या पिण्याचे मोठे संकट निर्माण झाले असताना, मोकाट जनावरेदेखील चाऱ्यांच्या शोधात भटकत आहेत. आधी वाहतूक शाखेने तर आता नगरपालिकेने या जनावरांना चारा खाऊ घातला. एका दिवसाची भूक भागली मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच वणवण गुरांच्या पायी आहे. त्यामुळे कायमस्वरूपी त्यांची व्यवस्था करण्याची गरज आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशाच भयंकर परिस्थितीत हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मानसांसह मोकाट फिरणाऱ्या गुरांचाही गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला खाऊन पोट भरणाऱ्या गुरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे सैरावैरा होऊन गुरे रस्त्यावर भटकंती करत आहेत.
गुरांची ही दशा पाहून यापूर्वी वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोळकर यांनी कर्मचाऱ्यांना सुचना देऊन या गुरांना चारा विकत घेऊन खाऊ घातला. एक दिवस चारा खाऊ घातला असला तरी रस्त्यावर फिरणारी गुरेही उपाशी असल्याचे त्यांच्या या उपक्रमातून समोर आले होते. त्यामुळे विविध दानशुरांनी तसेच सामाजिक संस्थांनी समोर येऊन या गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते मात्र, तसे झाले नाही. तर, यावेळी उपाशी राहणाऱ्या गुरांची दशा हिंगोली नगरपालिकेला पाहवली नसल्याने, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी शिंदे, संदीप घुगे यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी चारा विकत घेऊन, गुरांना खाऊ घातला आहे.
चारा मिळाल्याने गुरांचा आजचा दिवस ढकलला असला तरी उद्या त्यांच्यावर भटकंती करण्याची वेळ टाळण्यासाठी तरी निदान विविध सामाजिक संस्था तसेच, दानशुरांनी पुढे येऊन चाऱ्यासाठी मदत करण्याची गरज आहे. नाहीतर या विदारक परिस्थितीत गुरांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. या उपक्रमातुन चारा विक्रत्यालाही चांगले दिवस आले आहेत. सध्या अनेकजण मदतीसाठी धावून आले आहेत. मात्र, गुरांकडे का कसे कुणाचे लक्ष राहत नसावे, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.