हिंगोली - मंत्री संजय राठोड यांच्यासाठी आम्ही जीवाचे रान करणारे आहोत, आमच्या तुम्ही अजिबात नादी लागू नका, आम्ही खूप शांत आहोत हे समजू नका की आम्हाला राग येतोय, आमचा अंत अजिबात बघू नका, संजय राठोड यांना फसवण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, विरोधकांचे हे षडयंत्र आम्ही अजिबात पूर्ण होऊ देणार नाही, असा ठाम निर्णय बंजारा समाजाच्यावतीने काढलेल्या मोरचाकरी महिलांनी केला आहे. हे संपूर्ण कटकारस्थान भाजपचे असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.
मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हिंगोली येथे बंजारा समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज हा दाखल झाला होता. यात महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्च्यात दाखल झाल्या होत्या. संजय राठोड यांना अडकवण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न आम्ही अजिबात यशस्वी होऊ देणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. संजय राठोड यांच्यावर आरोप केले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा पेटून उठेल, असे आंदोलनातील महिलांनी सांगितले.
दुसरीकडे शिवसेनेच्यावतीने देखील मोर्चाला पाठींबा देत, बंजारा समाजासाठी शिवसेना देखील रस्त्यावर उतरली आहे. मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप थांबलेले नाहीत, तर रस्त्यावरून एकही वाहन चालू देणार नसल्याची धमकी आमदार संतोष बांगर यांनी यावेळी दिली.
पारंपरिक वेशभूषेत महिला झाल्या होत्या सहभागी
या मोर्चामध्ये ग्रामीण, शहरी भागातून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून दाखल झालेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. हिंगोली शहरातील शिवसेना कार्यालयाजवळ मोर्चाचा समारोप करून, चार ते पाच जणांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.