हिंगोली - तालुक्यातील कनेरगाव नाका येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बौद्ध भदंतांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. भदंत महाकश्यप (रा. वडाळी जि. अकोला) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने कनेरगाव नाका येथे एकच खळबळ उडाली आहे.
भदंत महाकश्यप हे मोप येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, कनेरगाव नाका येथील उपबाजार समिती जवळ भदंताना पाठिमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेत ते रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. दरम्यान, घटनास्थळी मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - हिंगोलीतील 'या' गावात मृत्यूनंतरही नाही सुटका.. सरणावर जाईपर्यंत भोगाव्या लागतात यातना
घटनेची माहिती मिळताच कनेरगाव नाका येथील चौकीचे जमादार साहेबराव राठोड आणि विजय महाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटना अकोला-नांदेड महामार्गावर झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत होते. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा - नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ औंढा येथे रास्ता रोको, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिल औंढाचा पुढाकार