हिंगोली - एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कळमनुरी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या ४ बसवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर हिंगोली शहरातील ईदगाह मैदानाजवळील रस्त्यावर हिंगोली आगाराच्या मानव विकास बसवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे हिंगोली आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
बस फोडल्याची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले, तर सुरक्षेचा उपाय म्हणून हिंगोली आगारात बसेस लावण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात आल्या नाही. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली, तर काही प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत होते. मात्र, भीतीपोटी खासगी वाहने देखील थांबवण्यात आली. त्यामुळे बाहेरगाववरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
हिंगोली येथे फोडलेली मानवविकासची बस हिंगोली शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली आहे, तर जिल्ह्यातील पाचही बसस्थानकावर पोलीस प्रशासनाच्यावतीने चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कळमनुरी येथे ४ बसेस फोडण्यात आल्यामुळे स्वतः पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे कळमनुरीत तळ ठोकून आहेत.
सेनगाव आणि कळमनुरी येथे बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे त्याठिकाणी पोलीस प्रशासनाच्यावतीने खबरदारी म्हणून बंदोबस्त वाढवला आहे, तर वसमत तालुक्यातील हट्टा येथे आंदोलन केले जाणार असल्याने त्याठिकाणी देखील बंदोबस्त वाढवण्यात आला. जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने शांततेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. सर्व खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपावर खुले पेट्रोल न देण्याच्या सूचनेचे फलक लावण्यात आले आहेत.