हिंगोली - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फुट उंच असलेला पूर्णकृती पुतळा आज जयपूर येथून वसमत येथे दाखल झाला. त्यामुळे, पुतळ्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. मात्र, याच घाईगडबडीत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी थेट घोड्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. तर, नवघरे यांनी या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत माफी देखील मागितली आहे.
हेही वाचा - आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
जयपूर येथे पंचधातूपासून बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फुटी पुतळ्याचे जिल्ह्यामध्ये आगमन होताच त्याचे विविध पक्षाच्या वतीने थाटामाटात स्वागत करण्यात आले. तर, पुतळा वसमत शहरात दाखल होताच राष्ट्रवादीचे आमदार यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी गेले असता आमदार नवघरे हे महाराजांच्या घोड्यावर चढले आणि घोड्यावर बसून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला. पुष्पहार अर्पण केल्याचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया, तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचंड व्हायरल झाल्याने आमदार नवघरे यांच्या कृतीबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे.
नवघरे यांनी व्यक्त केली दिलगीरी
वसमत येथे पुतळा उभारावा यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नाला यश देखील आले. त्यामुळेच आम्ही सर्वपक्षीय पुतळा शहरात दाखल झाल्याच्या आनंदामध्ये स्वागत करत होतो. सर्वांच्या वतीने मला पुष्पहार अर्पण करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुढे आलो होतो. माझ्याकडून जे घडले त्या कृतीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले.
हेही वाचा - आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल