हिंगोली - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा तिच्याच शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. ओंढा नागनाथ तालुक्यातील देवतळा येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.
हेही वाचा - भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार; मुलगा गंभीर
माया रितेश उर्फ पिंटू राठोड (वय 28) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माया ही चार दिवसांपासून गायब होती. तिचा नातेवाइकांकडे शोध घेण्यात आला मात्र तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे तिचे नातेवाइक ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यासाठी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांनी प्रत्येक वेळी त्यांना धीर देत माघारी पाठवले. शेवटी स्वतःच्याच शेतातील विहिरीत तिचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनतंर विवाहितेच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
मृत विवाहितेला अनेक महिन्यापासून सासरच्या मंडळींचा त्रास होता. परंतु आम्ही अनेकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही वातावरण शांत होत नव्हते अणि आज माझ्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तिने आत्महत्या केली नसून तिची हत्त्या केल्याचा आरोप वडील सुभाष राठोड यांनी केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याच्या सपोनि सविता बोधनकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसुन पुढील तपास सुरू आहे.