हिंगोली- मराठा आरक्षणाने न्यायालयात तग धरल्यानंतर आज शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मराठा बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मराठा आरक्षणासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. नंतर पुतळा परिसरात फटाके फोडून आरक्षण मिळाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी 'एक मराठा लाख मराठा' या घोषवाक्यांनी हिंगोली नगरी दुमदुमून गेली होती.
आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्वांनाच हेवा वाटेल अशा शिस्तबद्ध अन शांतेत मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले होते. या आरक्षणसाठी मराठा समाजातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली होती. त्यांचे बलिदान अजिबात व्यर्थ गेले नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी मराठा बांधवांकडून दिल्या जात होत्या. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात मंजुरी मिळताच हिंगोली जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. अथांग प्रयत्नानंतर मिळालेले हे आरक्षण मराठा समाजासाठी खूप महत्वाचे असल्याने हा विजय सर्वाधिक मोठा मानला जात आहे. याच क्षणाची सकल मराठा समाज अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत होता.
आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या १३ टक्के आरक्षणामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.