हिंगोली - जिल्ह्यात जमठी खुर्द शिवारात ट्रॅक्टरने नांगरणी करताना शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. ही बाब वनविभागाला समजताच विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी त्या भागात पथक पाठवून पायाच्या ठशांवर तो बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनातून सावरलेले शेतकरी खरिपाची पेरणी तोंडावर आल्याने शेतीच्या कामाकडे वळले आहेत. अशातच आता बिबट्या आढळल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. सध्या वनविभागाचे पथक त्या भागात तळ ठोकून आहे.
बिबट्या हा एका ठिकाणी थांबणारा प्राणी नाही, तो भक्ष्य शोधण्याच्या किंवा पाण्याच्या शोधात आला असावा. त्यामुळे, शेतकऱ्यांनी काही दिवस एकट्याने शेतात काम करायचे टाळावे, असे आवाहन विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे. तसेच शेतशिवारात असलेली आपली जनावरे घरीच बांधण्यात यावीत, असेही आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.