हिंगोली - शिरळी येथील नागरिकांनी काळ्याबाजारात विक्री होत असलेला तब्बल ५० किलो शालेय पोषण आहार कुरुंदा पोलिसांच्या स्वाधीन केला होता. मात्र, याला आठ दिवस उलटले असले तरी या प्रकरणी तक्रार देण्यासाठीच कोणीच समोर न आल्याने पोलीस याप्रकरणी कोणतीही कारवाई करत नाहीत.
रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याने आधीच चर्चेत असलेला हिंगोली जिल्हा या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला. ट्रकने शाळेमध्ये वाटपासाठी नेण्यात येणारा पोषण आहार चालक आणि हमालाच्या संगनमताने वसमत तालुक्यातील शिरळी येथे विक्री केला जात होता. ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यांनी ताबडतोब हा प्रकार कुरुंदा पोलिसांच्या कानावर टाकला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर वसमत तालुक्यातील कोणत्या शाळेवर कमी प्रमाणात शालेय पोषण आहार पोहोचला आहे याचा अहवाल कुरुंदा पोलिसांनी शिक्षण विभागाला मागितला.
मात्र याला आठ दिवस उलटून गेले असले तरी अजूनही शिक्षण विभागाने हा अहवाल दिला नाही. त्यामुळे पोलिसांना पुढील कारवाई करण्यास अडचण येत आहे. शिक्षण विभागाने अजूनही अहवाल न दिल्यामुळे, शिक्षण विभाग हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात आहे की, काय अशा चर्चा गावामध्ये रंगत आहेत. तसेच, एरवी बाकी प्रकरणांमध्ये स्वत: तक्रार दाखल करणारे पोलीस खाते याच प्रकरणात नियमांवर बोट का ठेवत आहे? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.