वसमत (जि. हिंगोली) - अनेकदा दवाखाने, औषधोपचार करूनही विवाहितेच्या पोटात गर्भ टिकत नसल्याने पतीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना वसमत तालुक्यातील सोना येथे 10 जून रोजी घडली होती. याप्रकरणी 14 जून रोजी हट्टा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मीराबाई गोविंद जाधव असे मृत महिलेचे नाव असून, मीराबाई यांचा 2015 मध्ये सोना येथील गोविंद यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही महिने त्यांचा संसार सुरळीत चालला होता. मात्र, त्यानंतर हळू हळू मीराबाई यांना घरात लहान-सहान कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात झाली. अनेकदा दवाखाने करूनही तुझा गर्भ टिकत नाही, तसेच मला दवाखान्यामध्ये खर्च करावा लागतो अशी एक ना अनेक कारणे सांगून मीराबाई यांना मानसिक त्रास दिला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी "माहेरहून दवाखान्याच्या खर्चासाठी 50 हजार रुपये घेऊन ये" असे म्हणून मीराबाई यांना घराबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर १० जूनला त्या जेव्हा सासरी परतल्या, तेव्हा पैसे आणले नाहीत, म्हणून त्यांना शिवीगाळ करत त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.
याप्रकरणी मयत मीराबाई यांचे वडील विठ्ठल धस (रा. पांढरी जि. परभणी) यांच्या फिर्यादीवरून पती गोविंद प्रभाकर जाधव विरुद्ध हट्टा पोलिस ठाण्यात 302, 304 (ब), 498 (अ), 323, 504, 506 कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी देशमुख, सपोनि गजानन मोरे, एस.डी बिडवे यांनी भेट दिली. वास्तविक पाहता सुरुवातीला आरोपीने सदरील घटना ही आत्महत्या असल्याचा बनाव केला होता. मात्र, पोलिस ठाण्याचे सपोनी मोरे व त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांनी अतिशय बारकाईने तपास केला. तपासात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या घटनेत पोलिसांचे कसब उपयोगी ठरले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : हिंगोली : उप-जिल्हाधिकारी अन् पोलिसांच्या वादाला खोटेपणाची फोडणी