हिंगोली - पोलिसांची नजर चुकविण्यासाठी गुटखा माफिया वेगवेगळे फंडे आजमावून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मका घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत बिंग फुटले आहे. या कारवाईत सुमारे 22 लाख 44 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातून नांदेडमार्गे ट्रकमधून गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्यासह पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्याकडून नांदेडमार्गे जाणाऱ्या ट्रकला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये मका पिकाच्या बियाणांचे पोते आढळून आले. मात्र पोलिसांना याच ट्रकवर संशय होता. त्यामुळे ट्रक हा ताब्यात घेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणला. त्यातील सर्व पोते खाली उतरविले. मका पिकांच्या पोत्यामध्येच गुटख्यांची पोते आढळून आली आहेत.
पोलिसांना ट्रकमध्ये तब्बल 110 पोते गुटखा आढळून आल्याने पोलिसही चक्राहून गेले. भांडाफोड झाल्याने चालकाचा बनाव उघडकीस आला. त्यामुळे चालक शेख बबलू व शेख जाकेर (दोघेही रा. अर्धापूर, जि. नांदेड) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी काहीही माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. कारंजा येथून नांदेड येथे ही गाडी पोहोचविण्याचे मालकाने सांगितले. करंजी ते नांदेड मार्गावर काही किलोमीटर अंतरावर चालकांची बदली केली जात असल्याचीदेखील धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
शेख बबलू याच्यावर नांदेडपर्यंत हा ट्रक पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांनी 22 लाख 44 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच 90 हजार रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे. पोलिसांनी एकूण 31 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.