हिंगोली - जिल्ह्यात पोलिसांचे सतत धाडसत्र सुरू असले तरी गरीबांच्या तोंडचा घास पळवत काळ्याबाजारात विकणाऱ्यांची टोळी आजही सक्रीय असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात तब्बल 17 क्विंटल 50 किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहरापासून काही अंतरावर असलेल्या लिंबाळा मक्ता येथील एका गोडाऊनमध्ये केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. मात्र, काळाबाजार सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
सचिन घन, असे तांदूळ साठवून ठेवणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याचा साथीदार कदम याच्याशी संगनमत करून, 29 सप्टेंबरला शिधावाटपासाठी आलेल्या धान्याचे पोते हे काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना मिळताच त्यांनी पथकासह लिंबाळा भागातील गोडाऊनवर छापा मारला.
त्या ठिकाणी 36 हजार रुपयांचा 17 क्विंटल 50 किलो तांदूळ साठवून ठेवलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. हा तांदून सरकारने गोरगरिबांना शिधापत्रिकेवर कमी किमतीमध्ये देण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र, आरोपीने स्वतःचा काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल साठवून ठेवला होता. त्यामुळे या आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - हाथरस प्रकरणी हिंगोलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन