हिंगोली - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही शनिवारपासून लागू झाल्यानंतर लगेचच हिंगोली जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले 'कोणी आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधिताविरुद्ध अवघ्या १०० मिनिटांत आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच उमेदवाराला २८ लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा असून त्यांचा प्रत्येक खर्च बारकाईने तपासला जाणार असल्याचे जयवंशी यावेळी म्हणाले.
हेही वाचा - निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग
हिंगोली, कळमनुरी आणि वसमत विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसत आहे. तीनही मतदार संघात ९ लाख ९२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या कालावधीत विशेष पथकाची स्थापना केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जयवंशी यांनी सांगितले. यात १३ स्थिर सनियंत्रण पथक, १४ भरारी पथक, ११ व्हिडिओ सनिरीक्षक पथक, ३ व्हिडीओ चित्रीकरण पथक, ३ निवडणूक खर्च नियंत्रण पथकाची नेमणूक केली आहे. तसेच वसमतमध्ये ३८, कळमनुरी ३६ आणि हिंगोलीत ४२ असे ११६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर मतदान केंद्रावर ४ हजार ४ आणि राखीव ८१३ कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवैधरित्या दारू, पैसा, वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर मतदाराने आपापली नावे मतदार यादीत नोंदविले आहेत की नाही यासाठी संकेतस्थळ देखील उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तसेच मतदारांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक अन् चोवीस तास जिल्हा संपर्क केंद्र , तक्रार निवारण कक्षदेखील स्थापन केले आहेत.
निवडणूक कालावधीत कुठे पोस्टर किंवा कुठे सभा सुरू असेल तर त्याचे मोबाईलवरून कुणी जर व्हिडिओ अपलोड केले तर त्या ठिकाणी पथक धाव घेऊन ताबडतोब कारवाई करेल, असेही ते म्हणाले. उमेदवाराला २८ लाखापर्यंत खर्च करण्याची मर्यादा असून त्यांचा प्रत्येक खर्च बारकाईने तपासला जाणार आहे. ज्या ठिकाणी सभा आहे, त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करून तेथे वापरण्यात आलेल्या प्रत्येक बाबीचा खर्च उमेदवाराने लावला की नाही याची पडताळणी देखील केली जाणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी यांच्यासह पाचही तहसिलचे तहसीलदार उपस्थित होते.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी