हिंगोली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगात कामाला लागले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर तैनात असलेल्या पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी नगर पालिकेच्यावतीने शहरात दहा ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था केली आहे. मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
हिंगोलीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नगरपालिकेच्यावतीने शहरांमध्ये बारकाईने साफ-सफाई केली जात आहे. पालिकेच्यावतीने शहरात दहा ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था केली आहे. 200 लिटर पाण्याच्या टाक्या स्टँडवर ठेवून त्यात अग्निशामक दलातील बंबाच्या सहाय्याने पाणी टाकले जात आहे.
हात धुण्याची व्यवस्था केल्याने मुख्याधिकारी रामदास पाटील यांचे कौतुक केले जात आहे. याबरोबरच शहरातील विविध भागात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत जेवण पोहचवण्याचा प्रयत्न नगरपालिका आणि सामाजिक संस्था करत आहेत. अभियंता मयूर कयाल यांनी शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप केले.