हिंगोली - शहरातील एका खासगी लॉजमध्ये कार्यालय थाटून मुद्रा लोन मिळवून देण्याचे म्हणत एका व्यक्तीने अनेकांची फसवणूक सुरू केली. एवढेच नव्हे तर तो अर्ज भरून घेत त्याची पावती ही देत होता. या प्रकरणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकत त्याला ताब्यात घेऊन, विचारपूस केली, तर बनवाबनवीचा प्रकार निघाला.
पोलिसांनी कार्यालयातून तीन ते चार पावती बुक ताब्यात घेतले होते. याप्रकरणी श्रीकांत संभाजी भिडे, (सिरंजगाव), गणेश सांगळे (हिंगोली), असिफ शेख (हिंगोली) या तिघांविरोधात अब्दुल मतीन अब्दुल गफूर यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे आरोपी मागील काही दिवसापासून कार्यालय थाटून मुद्रा लोन मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना लुबाडण्याचा व्यवसाय सुरू केला होता. हा प्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये, यासाठी आरोपी प्रत्येकाला वेगवेगळ्या तारखा देत त्यांच्याकडून ३०० रुपये घेऊन मुद्रा लोन मिळवून देण्यासाठी अर्ज भरून घेत होते. एवढेच नव्हे, तर मुद्रा लोन मिळाले नाही, तर थेट माझ्याकडे परत या? अशी हमीदेखील ते घेत असल्याने, अनेकानी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अर्ज भरले. कार्यालयात अधून मधून गर्दी वाढत होती. त्यामुळे या भागात नेहमीच नागरिकांची वर्दळ होत असे. बरेच जण याची माहिती कुणाला लागू नये, याची देखील काळजी घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळताच छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला.
पावती बुकात नावांची संख्या जास्त असल्याने जवळपास तीनशे ते चारशे जणांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पावतीत नाव असलेल्यांसोबत पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कणेकर करत आहेत.