हिंगोली - दुष्काळात पिचलेल्या शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे पेरणीसाठी त्याची लगबग सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संतुक पिंपरी येथील वार्धक्याकडे झुकलेले एक शेतकरी शाररिक अंपगत्वावर मात करत अस्मानी संकटालाही तोंड देऊन मोठ्या जिद्दीने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गणपत झिपरगे (67) असे या शेतकऱयाचे नाव. गणपतरावांना तीन वर्षापुर्वी अर्धांगवायू झाला आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमीन असून तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पुर्णतः कोलमडले. तरीही यावर्षीही मोठ्या धीराने ते खरीपाच्या तयारीला लागले आहेत. मात्र, पावसाला अद्याप सुरुवात झाली नाही. शिवाय पावसाच्या प्रतीक्षेत असेलल्या गणपतरावांना बी-बियांण्यांची चिंता लागली आहे.
पेरणी तोंडावर येऊन ठेपल्याने शेतीच्या कामाला गती आली खरी पण पेरणी करण्यास खत बी बियाणे घेण्यासाठी खिशात दमडी नाही तरी ही गणपत राव खचून न जाता. खते बि- बीयाने खरेदीचा विचार करत बसलेत. कधी या पाहुण्याकडे तर कधी बँकेतुन पैसे मिळविण्यासाठी गणपतराव धडपड करीत आहेत. एवढे करून ही पावसाने साथ दिली नाही तर यंदाचा ही खरीप हंगाम हातचा गेल्या शिवाय राहणार नाही. पुन्हा तेच ते दिवस या गणपतरावावर आल्याशिवाय राहणार नाहीत. यंदा तरी निसर्ग साथ देईल अशी आशा गणपतराव यांना आहे.
तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायू झाला, तर त्यांची पत्नीही विविध आजाराने ग्रस्त आहे. त्यांचा एकुलता एक मुलगाही अपघातात गेला. त्यामुळेच आता सर्व जबाबदारी गणपतराव यांच्यावर येऊन ठेपली. त्यांच्या मूलाला एक मुलगा मुलगी असून मुलगा सहावी अन मुलगी आता आठवीत आहे. निदान त्यांच्यासाठी तरी भविष्यात काही मदत होईल म्हणून मुलाचे काही तरी पैसे मिळतील यासाठी गणपतराव खूप प्रयत्न केले, पण हाती काहीच आले नाही. आता सून अन् नातवांना वाऱ्यावर कसं सोडणार म्हणून दुःख बाजूला सारून गणपतराव पुन्हा शेतीच्या कामाकडे वळले आहेत.
शासन उज्जवल गॅस योजनेतून घरोघरी गॅस पोहोचल्याचा दावा करत असले तरी गणपतराव यांच्या घरी ही योजना अजून पोहोचलीच नाही. अजूनही चुलीचाच आधार घ्यावा लागतो. कधी जावई अन मुलगी शेतीच्या कामात मदत करतात. मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गणपतराव यांच्या शेताला भेट दिली होती. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी अन फोटो काढण्यासाठी होत असलेली घाई पाहून गणपतराव यांचे पालकमंत्र्या सोबत बोलणे देखील झाले नसल्याची खंत गणपतरावांनी व्यक्त केली.
तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न-
अर्धांगवायू झाल्याने घरापासून शेतापर्यंत चालणे कठीण होते. त्यामुळे गणपतराव हे शेतातच वास्तव्य करतात. मुलाच्या निधनाचे दुःख सांगताना गणपतरावांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. मात्र काही क्षणात डोळे पुसून पुन्हा स्वतःला सावरत बोलण्याचा प्रयत्न करतात. अर्धांगवायू झाल्याने तोंडातून स्पष्ट उच्चार ही होत नाही मात्र दुःख सांगण्याचा ते प्रयत्न करतात.
अनेकदा त्यांनी ही आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. मात्र आपण गेल्यानंतर कुटुंबाचे कसे होणार या विचाराने त्यांनी स्वत:ला सावरले आणि कामाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. आता पेरणी तोंडावर येऊन ठेपलीय. तरीही खते बी बियाणांची व्यवस्था नाही. नतेवाईकांच्या भेटी घेत आहेत. निदान यंदा तरी निर्सग साथ देईल हीच अपेक्षा ते उराशी बाळगून आहेत.