हिंगोली - आखाडा बाळापूर येथून हदगावमार्गे जाणाऱ्या बसवर कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारात चार जणांने दगडफेक केली. त्यानंतर ती बस पेटवून देण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हदगाव आगारची बस बाळापूर येथे नियमित दोन फेऱ्या करते. तर बस मुक्कामी हदगाव येथे जाते. नेहमी प्रमाणे हदगाव आगाराची बस (एम. एच. 40 एन 9801) बाळापूरहून हदगावमार्गे 14 प्रवासी घेऊन निघाली होती. बस शेवाळा फाट्यापासून देवजना शिवारात पोहोचली. त्यावेळी बस समोर अचानक चार तरुण आले. ते रस्त्याच्या मधोमध थांबल्याने बस चालकाने बस थांबली. तर त्या चार जणांनी बस मधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यामुळे प्रकाराने प्रवासी काहीकाळ गोंधळले.
मात्र, प्रवासी खाली उतरल्यानंतर त्या चार जणांनी बसवर दगडफेक केली. तसेच खिडकीच्याही काचा फोडल्या आणि बसमध्ये पेट्रोल टाकून पेटवून दिले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी, बस चालक व वाहक यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळात त्या चार जणांनी पळ काढला. चालक-वाहक आणि प्रवाशांनी आग विझवली. आगीत चार ते पाच आसने जळाली आहेत. चालकाने बस थेट बाळापूर पोलीस ठाण्यात नेली. चालक बी.एम. सुरुशे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - बनावट नोटा कारखाना प्रकरण : 'प्रहार'च्या जिल्हाध्यक्षाला एटीएसने घेतले ताब्यात