हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा येथील जि.प. प्राथमिक शाळेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात शाळेतील संगणक संच आणि शाळेचे इतर साहित्य जळून खाक झाले असून दीड लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची माहिती येथील शिक्षकांनी दिली आहे.
गढाळा येथील जि. प. शाळेत नेहमीप्रमाणे विद्यार्थी गेले असता, अचानक शाळेतील काही साहित्याने पेट घेतल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे मंदिर परिसरात उभ्या असलेल्या पालकांनी शाळेत धाव घेतली. यावेळी काही संगणक संचांनी पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आहे. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, आगीचे लोळ वाढतच जात होते. त्यामुळे ग्रामस्थांनी घरून भांड्याने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. या आगीत जवळपास दीड लाखांच्यावर नुकसान झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य जळल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - तालुका निर्मितीसाठी बाळापूरकरांची शासनाला पुन्हा आर्त हाक
मिळालेल्या माहितीनुसार पहाटे पहाटे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शाळेत असलेल्या इन्व्हर्टरमुळे शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. माहिती मिळताच गटशिक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता पंचनामा झाल्यानंतर खरे नुकसान समजले जाणार आहे.
हेही वाचा - हिंगोलीत नगर पालिकेच्या कारवाईत प्लास्टिक जप्त