हिंगोली - शेतकऱ्यांनी मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच दाखवून दिलेय एका शेतकऱ्याच्या मुलाने. एक दोन नव्हे तर तब्बल 535 शेतकरी एकत्र जोडून त्यांना आपल्या एकत्रित येण्याचे फायदे सांगून, कंपनी स्थापन केली. यामधून शेतकऱ्यांचा तर फायदा झालाच, आनंदाची बाब म्हणजे महिला व युवकांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. आता याच कंपनीतली हळद ही बांग्लादेशात रवाना झाली आहे. यातून कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीला फायदा झाला आहे तो फायदा वर्षाच्या शेवटी सभासदांना वाटप केला जातो. या कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून उत्पादित हळद दुसरीकडे कुठेही विक्रीसाठी घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. स्वतःच्याच कंपनीत तिची विक्री करून शेतकऱ्याला हजारो रुपयांचा नफा मिळत आहे.
हळदीची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना हातोहात पैसे
प्रल्हाद बोरगड राहणार सातेफळ (अध्यक्ष) असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. जिद्दीच्या जोरावर यांनी शेतकऱ्यांना एकत्र जोडून कंपनीचे महत्त्व पटवून दिले. 'सूर्या फार्म लिमिटेड' या कंपनीची पाच ते सहा वर्षांपूर्वी स्थापना केली. मागील दोन वर्षांपासून हळदीला चांगली मागणी मिळू लागली आहे. आज घडीला बांगलादेश येथून या कंपनीच्या हळदीला मागणी आली आहे. त्यानुसार रात्रंदिवस या कंपनीमध्ये महिला व पुरुष कामगार राबून बांगलादेशची मागणीही पूर्ण करण्यासाठी झगडत आहेत. अजून एक आनंदाची बाब म्हणजे जेवढे काही या कंपनीमध्ये सभासद आहेत, त्या शेतकऱ्यांना आपली हळद इतरत्र विक्रीसाठी घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. आपल्या हक्काच्या कंपनीमध्ये हळदीची विक्री केल्यानंतर त्यांना हातोहात पैसे दिले जातात. हळदीवर पुढील प्रक्रिया करून ती पुढे बाजारपेठांमध्ये विक्री करण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. आता बांगलादेश येथील ऑर्डरही मोठी असल्याने त्या ठिकाणी स्वतः या कंपनीला हळद देण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे या शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांची साथ घेऊन बांगलादेशला हळद पोहचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
वर्षाकाठी कंपनीला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळणार
त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये या कंपनीचे उत्पादन जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातही आता चांगलेच ओळखीचे बनले आहे. या कंपनीच्या हळदीला सर्वाधिक जास्त मागणी येत असल्याने या वर्षी निश्चितच वर्षाकाठी कंपनीला करोडो रुपयाचे उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. नियमित मजुराला काम मिळावे म्हणून कंपनीचे असलेले अध्यक्ष हे वेगवेगळी कामे घेत असतात. आता या ठिकाणी हळदी पाठोपाठ केळीवर देखील प्रक्रिया केली जाणार आहे.
बंद पडलेला हॉल घेतला
दिवसेंदिवस शेतीमाल कंपनीकडे खरेदीसाठी येत असल्याने कंपनीला जागा अपुरी पडत होती. त्यामुळे भोरगड यांनी भाडेतत्वावर एक रिकामा हॉल घेतला आहे. त्यामध्ये रात्रंदिवस काम करून उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. जवळपास 70 ते 80 हजार रुपये भाडे त्यासाठी मोजावे लागतोय.